पोलादी पंजातून मुक्त – पोलंड
वरील फोटोत दिसणार्या
या घरातच शोपेनचा जन्म झाला आणि बालपणातील काही वर्षे याच घरात गेली. या घराच्या
अर्धा भागात शोपेनचे कुटुंब राहत होते. संगीताचे शिक्षण अगदी कमी वयातच पूर्ण करून
त्याने संगीत रचना करण्यास सुरुवात केली. नाजूक प्रकृतीचा हा संगीतकार वयाच्या
विसाव्या वर्षी फ्रांस मध्ये गेला आणि तिथेच स्थायिक झाला. त्या नंतरच्या अवघ्या
१८-१९ वर्षात त्याने अनेक रचनांची निर्मिती केली. गर्दी आणि प्रसिद्धी यांच्या
पासून दूर राहणार्या या थोर संगीतकाराने आपल्या आयुष्यात जेमतेम ३० जाहीर मैफिली
केल्या. तो जाहीर मैफिलीं पेक्षा एखाद्या यजमानाने आयोजित केलेल्या मोजक्याच
रसिकांच्या खाजगी मैफिलीत रमे. अशा खाजगी मैफिली (ज्याला सॅलॉन् (Salon) असे म्हटले
जाई) आणि संगीत शिक्षणाचे वर्ग यावरच त्याची गुजराण चाले.
फेड्रिक शोपेन
| शोपेनच्या सुरावटीचे नोटेशन |
| शोपेन म्युझियमचे उद्यान |
| शोपेन म्युझियमचे उद्यान |
या उद्यानात फिरणे हा अलौकिक अनुभव आहे. कारण या उद्यानात फिरत असताना शोपेनच्या संगीताच्या सुरावटी अगदी मंद आवाजात कानी पडत असतात. सकाळच्या दंवाने किंचित ओले झालेले गवत, स्वच्छ निरभ्र आकाश, थंडी नाही आणि उकडत नाही अशी “परफेक्ट” हवा, मधेच येणारी वाऱ्याची झुळूक आणि नीरव शांतता.... या सर्वावर कडी म्हणजे या नीरव शांततेचा भंग न करता कानावर येणारी शोपेनची सुरावट. मला नाही वाटत की स्वर्ग या पेक्षा वेगळा असेल. शोपेनच्या या सुरावटी उद्यानात सर्वत्र दडवलेल्या स्पीकर्स मधून येत होत्या. त्यामुळे कुठेही फिरत गेलात तरी सारख्याच आवाजात त्या ऐकू येतात. मी आणि विक्रम पाऊण-एक तास एकही शब्द न बोलता फिरत होतो. (अविश्वसनीय गोष्ट आहे पण सत्य आहे. एक तास आम्ही नि:शब्द होतो).
| उद्यानातील नृत्य वर्ग |
या घरापासून थोड्या अंतरावर एक १६व्या शतकातील चर्च आहे जेथे शोपेनचे आई-वडीलांचा विवाह झाला होता आणि शोपेनचा बाप्तीसा सुद्धा.
या म्युझियम मधेच आम्हाला बातमी कळली की वॉर्सा शहरात झाकेता (Zachęta) नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट आहे आणि तिथे दर विकेंडला तिथल्या बागेत concert असते. ही concert सर्वांसाठी खुली असते. मग लगेच लक्षात आले की अरे आज रविवारच आहे. तेंव्हा काहीही करून जायचेच. अधिक चौकशी करून नक्की कुठे ते माहित करून घेतले आणि समजले ही आमच्या हॉटेल पासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे. चक्क लॉटरी लागल्या सारखे वाटले. म्युझियम मधून परतत असताना वाटेवर विस्चला (Vistula) नदीच्या तीरावर असलेला राजवाडा (The Royal Castle) पाहीला मिळाला. या राजवाड्याचे आता म्युझियम केले आहे.
विस्चला (Vistula) नदीच्या तीरावरील रॉयल कॅसल
संध्याकाळी
गुगल काकांच्या भरवशावर नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट जवळील बाग शोधत निघालो. अवघ्या ५-७
मिनिटात पोचलो. अत्यंत भव्य बाग. आम्ही वीस पंचवीस मिनिटे ती बाग चारी दिशांनी
तुडवली. त्यात मध्ये एक पावसाची सर पण येऊन गेली. पण कुठे काही concert ची नांवनिशाणी नाही. डोळे आणि कान उघडे ठेवून
चारी दिशांना हिंडलो. कुठून तरी पियानो, व्हॉयलिन, चेलो
कशाचे तरी सूर ऐकू येतील, कुठे तरी रसिकांचा जमाव दिसेल. पण कसलं
काय.... शेवटी निराश होऊन परत फिरण्यासाठी मुख्य रस्त्यावर आलो. तोच पुन्हा
पावसाची सर आली. आडोसा म्हणून एका इमारतीच्या पोर्च मध्ये उभे राहिलो. इमारत १८-१९व्या
शतकातील असावी. दगडी बांधणी. भव्य दरवाजा जो बंद होता. पुढे प्रशस्त रूंद पायऱ्या.
तिथे आमच्या बरोबर काही तरुण मुले-मुली उभी होती. काहींच्या हातात वाद्य (व्हॉयलिन,
फ्ल्यूट वगैरे). दिसण्या वरून काही कोरियन, काही जपानी / चिनी वाट होती. तर दोघं स्थानिक वाटले. या कॉम्बिनेशन मुळे
त्यांचे संभाषण इंग्रजीत सुरू होते. म्हणून आम्ही चौकशी केली concert विषयी. तेंव्हा कळले की concert तिथेच होती. म्हणजे त्या इमारतीच्या प्रांगणात.
ती इमारत झाकेता (Zachęta) नॅशनल गॅलरी ऑफ आर्टची होती. ती मुले संगीत
शास्त्राचे विद्यार्थी. दुर्दैवाने त्या
दिवशी concert पावसाळी हवामानामुळे रद्द झाली होती.
क्रकोव्हची सफर
दुसर्या दिवशी आम्ही प्रथम क्रकोव्ह (Krakow) या शहराला भेट देण्यास निघालो. हे शहर पोलंड मधील वॉर्सा नंतरचे महत्त्वाचे शहर आहे. ठरल्या प्रमाणे आम्हाला पिक-अप करायला गाडी घेऊन ड्रायव्हर आला. वेळे पूर्वीच १५ मिनिटे. आम्हीसुद्धा तयारच होतो. थोड्याच वेळात गाडी शहरा बाहेर आली आणि दोन्ही बाजूला शेते दिसू लागली. हळू हळू प्रवास आणि ड्रायव्हर बरोबर गप्पा रंगू लागल्या. आमचा चालक हा उच्च शिक्षित होता. अर्थशास्त्राचा पदवीधर असलेला हा इसम एका आंतरराष्ट्रीय कंपनीत Financial Analyst म्हणून काम करीत होता. वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची आवड म्हणून आणि “Extra Money” साठी सुट्टीच्या दिवशी हे काम करीत असे. गाडीही त्याची स्वःताची होती.
त्याची विनोद बुद्धी अगदी तीक्ष्ण होती. कम्युनिस्ट राजवटी वरील त्याच्या टिप्पण्या एकदम झकास होत्या. वाटेत एक झकास पंचतारांकित हॉटेल लागले. तो म्हणाला की हे ५ स्टार हॉटेल नुकतेच काही वर्षापूर्वी चालू झाले. आणि बाजूला दिसतात तीही हॉटेल्स आहे. त्या इमारतींकडे बघून आम्हाला धक्का बसला. ही हॉटेल्स आहेत? रया गेलेल्या म्हाडाच्या इमारतीसारखी इमारत. “Is it”? आम्ही आश्चर्याने विचारले तोच त्याने मंद हास्य करीत सांगितले की “Those were socialist star hotels”. ती कदाचित occupancy च्या मापदंडावर भव्य असतील कदाचित. पण अॅस्थेटिक्स म्हणून काही असत याचा काहीही विचार इमारतीच्या डिझाइन मध्ये नाही की बांधकामात नाही. असाच एक अनुभव माझ्या प्राग च्या सफरीतील लेखात (झकास झेक) वाचला असेलच.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे आता पोलंड मध्ये कम्युनिस्ट पार्टीवर बंदी आहे. म्हणजे “sort of”. कायद्याने एकाधिकारशाही, निरंकुश राजसत्ता अथवा तत्सम विचारधारेचे समर्थन करणे, प्रसार करणे तसेच द्वेष पूर्ण भाषण करणे यावर कडक बंदी आहे. १९८९ पासून पोलंड मध्ये द्वी-सदनी लोकशाही आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पंजातून सुटलेला पोलंड आता चांगलीच कात टाकतोय अस वाटलं. हे सगळं पाहत असताना, ऐकत असताना मनात एक नाव सारखं येत होत ते म्हणजे लेक वालेसा. इलेक्ट्रिशियन असणार्या या कामगार नेत्याने १९८० मध्ये सुरू केलेल्या संपापासून सुरू झालेल्या चळवळी मधून पुढे हे सत्तांतर घडून आले.
मी त्याला विचारले की इथे शेत मालाला चांगला भाव मिळतो का? शेतकर्यांना चार पैसे सुटतात का? तो म्हणाला की हा प्रॉब्लेम काही वर्षापूर्वी होता अगदी कम्युनिस्ट राजवटी नंतर सुद्धा. पण आता सरकार शेतकर्यांना सांगते की तुम्ही पिकवा आम्ही भाव देऊ. याचे मुख्य कारण पोलंड मधील फळ, फळभाज्या आणि इतर शेत मालाला युरोप मध्ये चांगली मागणी आहे. किमान एके ठिकाणी तरी शेतकरी समाधानी आहेत तर. अन्यथा बहुतेक ठिकाणी शेतकरी हा नडलेला असतो. विशेष म्हणजे तो स्वत: शेतकर्याचा मुलगा होता. वॉर्सा पासून ८०-९० किमी वर कुठल्याशा गावी वडील शेती करतात. पोलंड हा स्ट्रोबेरी, ब्ल्युबेरी, गुजबेरी अशा अनेक बेरी, चेरी, सफरचंद, बटाटे, बीट यांचा प्रमुख पुरवठादार आहे. गहू, मका (Maize) ही पिकेही होतात पण ती बरीचशी पशु खाद्य म्हणून वापरली जातात. याशिवाय पोल्ट्री प्रॉडक्टस, मांस, सिरीयल (cereals) याची सुद्धा निर्यात होते.
क्रकोव्ह या शहरास ९व्या शतकापासूनचा इतिहास आहे. विस्चला नदीच्या तीरावर असलेल्या या शहरास तटबंदी आहे. १९व्या शतकात केलेल्या काही नवीन बांधकामामुळे तटबंदीची काही तोड फोड झाली असली तरी भिंत अजून काही ठिकाणी शाबूत आहे. पण मध्ययुगीन काळात जवळपास २ किमी पेक्षा अधिक लांबीची ३९ मनोरे आणि ८ प्रवेशद्वार असलेली भिंत होती. तटबंदीची उंची १० मीटर असून रुंदी तब्बल अडीच मीटर आहे. आता मात्र यूनेस्कोने या जुन्या शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
| क्रकोव्ह शहराच्या तटबंदीची भिंत आणि मनोरा |
| Vasa प्रवेशद्वार |
| क्रकोव्ह बार्बिकन |
या शहरात अजूनही मध्ययुगीन इमारती (वोवेल राजवाडा आणि चर्च, इतर चर्चेस आणि कॅथेड्रल इ.) आहेत. तर शहरातील मुख्य चौकात असलेला क्लोथ हॉल हा रेनेसाँ स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. हा चौक ३.७९ हेक्टर एवढा भव्य असून युरोप मधील मध्ययुगीन काळातील सर्वात मोठा चौक आहे. हा चौक अतिशय भव्य आणि सुंदर आहे. चौकात बरीच कबुतरे दिसत होती. पण चौक (आणि शहरही) स्वच्छ होते. अगदी पुतळे, शिल्प, कारंजी ही सुद्धा स्वच्छ होती. याचे विक्रमला खूप आश्चर्य वाटले. एवढी कबुतरे असून हे एवढं स्वच्छ कस? त्याने आमच्या गाईडला विचारले सुद्धा की इकडे पुतळे रोज साफ करतात का? इतकी कबुतरे असून ते स्वच्छ कसे? या प्रश्नाचे तिलाही आश्चर्य वाटले. ती म्हणाली कबुतरे घाण करतातच पण रोज साफ करणे शक्य नाही. घाण आहेतच. (भारतीय आणि युरोपियन स्वच्छतेच्या मापदंडा मधील फरक). विक्रमच्या म्हणण्यात तथ्य होते. मलाही ते सगळे स्वच्छच दिसत होती. थोडा विचार केल्यावर वाटले की इकडे “ग्राहकांच्या मापातले मारून कबुतरांच्या पुढ्यात टाकणारी” जमात नाही. त्यामुळे खा खा खाऊन शिटणारी कबुतरे नाहीत. त्यामुळेच “आपल्या नजरेत” भरेल एवढी घाण दिसत नाही.
| मुख्य चौकातील क्लोथ हॉल |
| मुख्य चौकातील बॅसिलीका |
| मुख्य चौक (Main Square) |
आम्ही प्रथम
फ्लोरीन्स्का रस्त्यावर (Ulica
Florianska) भटकलो. शहरातील
या एका प्रमुख रस्त्यावर भटकण्यात वेगळीच मजा आहे. याच रस्त्यावर एक तीन घंटांचे
शिल्प असलेली एक इमारत आहे. याचा इतिहास रंजक आहे. ही इमारत १५१० मध्ये फौंड्रीमन
असलेल्या मार्सिन
कॅनेगिझर या इसमाने बांधली.
त्याने प्रवेशद्वारावर प्रतिक म्हणून तीन घंटांचे शिल्प बसवले. यात अनेक
कुटुंबांचे वास्तव्य होते. पुढे ही इमारत जोसेफ वेस यांनी लिलावात विकत घेतले आणि १८३० साली त्याची पुनर्बांधणी
केली. पण प्रवेशद्वारावर ते शिल्प तसेच ठेवले. आता फक्त त्या तीन घंटेतील मधल्या
घंटे वर १८३० हे साल आणि बाजूच्या दोन्ही घंटांवर J आणि W ही त्याच्या नावाची आद्याक्षरे
कोरली. थोडे नक्षीकाम केले. नंतर ही इमारत क्रिझिओनोव्स्की या माणसाने विकत घेतली.
त्याने आणखी थोडे नक्षीकाम केले आणि एका घंटे वरील J हे
अक्षर बदलून आपल्या आडनावातील K हे अक्षर कोरले. आज ही १८३०
सालची इमारत संरक्षित इमारत म्हणून महापालिकेने जाहीर केली आहे. फ्लोरीन्स्का रोड
तीन घंटांचे शिल्प असलेली इमारत
याच शहरात एक
छोटा आड रस्ता आहे तिथे शिंडलर्स लिस्ट या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. तो भाग
आता “शिंडलर्स पॅसेज” किंवा “शिंडलर्स स्टेअर्स” म्हणून ओळखला जातो.
आम्ही शहरात फेरफटका मारत वोवेल राजवाडा, कॅथेड्रल, चर्चेस, यागेलोनियन विद्यापीठ हे सगळे बघत पुन्हा मुख्य चौकात आलो. तिथे Igor Mitoraj या शिल्पकाराचे एक शिल्प (Eros blindfolded) ठेवले आहे. नंतर आम्ही क्लोथ हॉल मध्ये फेरी मारली. एकेकाळी क्लोथ हॉल हे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होते. येथूनच पूर्वे कडून मालाची (मसाले, चामडे, रेशीम इ.) आयात होत असे तर मीठ, शिसे, कापड याची निर्यात. यातील मीठ हे जवळच असलेल्या Wieliczka Salt Mine मधून येत असे. आजही ही Wieliczka Salt Mine पहावयास मिळते. क्लोथ हॉलच्या आतील भिंतीवर काही Coat of Arms पाहीला मिळतात. आज मात्र या क्लोथ हॉल मध्ये विविध दुकाने आहेत.
| Igor Mitoraj या शिल्पकाराचे Eros blindfolded हे शिल्प |
| कोट ऑफ आर्म्स |
| क्लोथ हॉल मधील दुकाने |
| यागेलोनियन विद्यापीठ |
हा फेरफटका मारताना एक गाईड आमच्या बरोबर होती. तिने शहराचा इतिहास छान सांगितला. नंतर मात्र काही वेळ आम्हाला भटकण्यासाठी मोकळा होता. मला तो मुख्य चौक फारच आवडला. त्या चौकात अनेक टांगे (घोडागाड्या) होत्या. पूर्वी गिरगावात व्हिक्टोरिया असायच्या तशा. त्यांचे सारथ्य मात्र सुंदर खाशा ललना करीत होत्या. एकूणच थाट एकदम कडऽऽक (घोड्यांचा, गाड्यांचा आणि ललनांचा सुद्धा).
| फ्लोरियन प्रवेशद्वार |
| फ्लोरीन्स्का प्रवेशद्वार |
या नंतर एका हॉटेल मध्ये आम्हाला जेवणासाठी नेले. अप्रतिम असे जेवण. सूप पासून सगळेच छान होते. मी परदेशात खालेल्या काही अप्रतिम जेवणा मधील एक असेच याचे वर्णन करीन. जेवून थोड्याश्या सुस्थावलेल्या अवस्थेत आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. पुढे काय वाढून ठेवलाय याची सुतराम कल्पना नव्हती असे नाही म्हणता येत. पण नंतर दोन अडीच तास जे काही अनुभवलं ते वर्णन करायला “भयंकर” हा शब्द फारच तोकडा आहे. विसरू म्हणता विसरता येत नाही. त्या बद्दल पुढल्या लेखात.
- सौर दिनांक भाद्रपद ८, शके १९४५ (30-Aug-2023)