झकास झेक

 

झकास झेक

(कार्लोव्ही व्हॅरी, प्राग, चेकी क्रूमलाव्ह, आणि कुतना होरा या शहरांची सफर)

 

काही शहर, गाव, अशी असतात की तिकडे “बघण्या सारखं काय आहे?” या प्रश्नाला ठराविक उत्तर नसत. अशा शहरात पाय नेतील तेथे भटकावं. त्या शहरांचा अवघा आसमंतच देखणा असतो. उदा. ऑस्ट्रीया मधील व्हिएन्ना (खरं तर ऑस्ट्रिया मधील झेल-अॅम-सी सारखी अनेक शहर किंवा गाव या कॅटेगरीत येतात) किंवा श्रीलंकेतील नूरा-एलिया, आणि चेक रिपब्लिक मधील स्पा व्हिलेज म्हणून प्रसिध्द असलेले कार्लोव्ही व्हॅरी.

कार्लोव्ही व्हॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
कार्लोव्ही व्हॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

कार्लोव्ही व्हॅरी, चेक (किंवा झेक) रिपब्लिक येथे जाण्याचे निमित्त होते तेथे दरवर्षी भरणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. कार्लोव्ही व्हॅरी चित्रपट महोत्सव हा मध्य व पूर्व युरोपातील आघाडीचा महोत्सव असून जगातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आहे. हा महोत्सव कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा प्रमाणेच प्रतिष्ठेचा आणि A ग्रेड महोत्सव आहे. या फिल्म फेस्टिवल साठी मी प्रथमच जात होतो. हा चित्रपट महोत्सव आणि त्यानंतर झेक रिपब्लिक, पोलंड, आणि हंगेरी अशी टूर करण्याचे ठरवले.

कार्लोव्ही व्हॅरी, चेक रिपब्लिक मधील एक छोटेसे शहर. शहर कसले, गावच म्हणायला हरकत नाही. राजधानी प्राग पासून अवघ्या १४० कि मी वर ओहीर (Ohře) आणि टेप्ला (Teplá) नद्यांच्या संगमावर वसलेले. आकाराने साधारण साठ चौरस कि मी. तर लोकसंख्या अवघी पन्नास हजार. हे शहर १२व्या शतकात कार्ल्सबाद (Karlsbad) म्हणूनही ओळखले जायचे.

इतिहासात बोहेमिया साम्राज्याचा भाग असलेल्या कार्लोव्ही व्हॅरीचा  संपूर्ण प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेला. गावाला इतिहास 13 व्या शतकापासूनचा. हे गाव इतिहासात आणि आजही प्रसिद्ध आहे स्पा व्हिलेज” म्हणून, ते इथे असलेल्या गरम पाण्याच्या ‍‌झऱ्यांमुळे. इथे स्पा रिसोर्ट्स भरपूर आहेत.

पर्यटन स्थळ असल्याने हॉटेल्स मुबलक आहेत. तसेच अपार्टमेंट देखील भरपूर मिळतात. खाण्या पिण्याची सोयही झकास आहे. तशी "पिण्याची" सोय युरोप मधे झकास असतेच म्हणा. 

कार्लोव्ही व्हॅरी मधील टेप्ला नदी

एका तीरावरून वाहतूक तर एका तीरावरून फक्त पादचाऱ्यांसाठी रस्ता. त्यामुळे इथे “चालणे” हा सुखद अनुभव आहे. अगदी रमत गमत चालता येते. रस्त्याच्या कडेला भरपूर रेस्टॉरंट. चालता चालता खावे किंवा खाता खाता चालत सुटावे. (असा चालण्याचा सुखद अनुभव आपल्याकडे फक्त गोव्यात. भारतात मला पणजी (गोवा) हे एकमेव Pedestrian friendly शहर वाटते. )

चालण्याचा सुखद अनुभव

एका तीरावरून वाहतूक तर एका तीरावरून फक्त पादचाऱ्यांसाठी रस्ता. त्यामुळे इथे “चालणे” हा सुखद अनुभव आहे. अगदी रमत गमत चालता येते. रस्त्याच्या कडेला भरपूर रेस्टॉरंट. चालता चालता खावे किंवा खाता खाता चालत सुटावे. (असा चालण्याचा सुखद अनुभव आपल्याकडे फक्त गोव्यात. भारतात मला पणजी (गोवा) हे एकमेव Pedestrian friendly शहर वाटते. )

 

९० आसनांचे Husovka Theatre
या छोट्याशा शहराला संगीत, नाट्य, इत्यादी कलांची पूर्वापार परंपरा असावी. असे वाटण्याचे कारण या एवढ्याश्या शहरातील थिएटरची संख्या. अवघ्या दोन-अडीच  किमी च्या रस्त्यावर दहा-बारा  थिएटर्स आहेत. बहुतेक थिएटर बहुउद्देशीय (Multipurpose). मुळात नाटक, ऑपेरा, संगीताचे कार्यक्रम (कॉन्सर्ट) या साठी असलेली पण त्यात फिल्म फेस्टिवल मधील चित्रपटांचेही खेळ होतात. यातील सहा स्क्रीन असलेले थर्मल थिएटर सोडले तर बाकी सर्व जुन्या काळातील सिंगल स्क्रीन पण सगळी अप्रतिम. अगदी छता पासून राजेशाही सजावट असलेली १८/१९ व्या शतकातील. ऑपेरा हाऊस सारखी तीन मजली  गॅलऱ्या  आणि बॉक्स असलेली. थर्मल थिएटरचे मुख्य थिएटर १२०० आसन व्यवस्था असलेले. तर सगळ्यात छोटे थिएटर मी पाहीले ते ७० आसनांचे. 

 

११५० आसनांचे थर्मल थिएटर

इकडे संगीत आसमंतात भरलेले आहे. जागोजागी कलाकार आपली कला सादर करीत असतात. रस्त्यात कुठूनही फ्लूट, चेलो, अथवा व्हॅायोलीनचे सूर येतात. अनेकवेळा सोबत गायन देखील. या सगळ्यांचा हेतू अर्थार्जन हाच असला तरी सादरीकरण चोख असते. आपल्या लोकल मधील शिर्डीवालेऽऽऽ साऽऽई बाऽऽऽबा किंवा परऽऽऽदेशी  परऽऽऽदेशी स्टाईल नाही. यातील कलाकार बहुधा म्युझिक स्कूलचे विद्यार्थी असतात. या गायक वादक मंडळींबरोबर काही चित्रकार सुद्धा आपआपल्या कलाकृती घेऊन बसतात.

 


एकूणच हे शहर अत्यंत देखणे, कलात्मक आणि कलासक्त सुद्धा. फिल्म फेस्टिवल साठी अगदी योग्य ठिकाण आहे हे. अगदी आपल्या पणजी सारखेच.

पुढच्या शहरांची भटकंती करण्यापूर्वी थोडे येथील चित्रपट महोत्सवा बद्दल. अशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि चित्र, नाट्य, संगीत परंपरा लाभलेल्या या कार्लोव्ही व्हॅरी मध्ये १९४६ पासून KVIFF हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  भरवला जातो.  कार्लोव्ही व्हॅरी चित्रपट महोत्सव हा मध्य व पूर्व युरोपातील आघाडीचा महोत्सव असून जगातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आहे. हा महोत्सव कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा प्रमाणेच प्रतिष्ठेचा आणि A ग्रेड महोत्सव आहे.

 


तेरा चित्रपट गृहात दररोज साधारण ४५ ते ५० खेळ होत. बहुतेक खेळ हाऊस फुल्ल. तिकीट न मिळालेले प्रेक्षक राखीव जागेतील रिकाम्या जागा (आणि काही कारणाने न आलेल्या प्रेक्षकांची जागा) मिळवण्यासाठी वेळे पूर्वी दिड दीड तास आधी रांग लावत. तर आपल्या पसंतीच्या चित्रपटाचे पास काढण्यासाठी नोंदणी केलेले सभासद अॅडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आदल्या दिवशी सकाळी सकाळी बुकिंग ऑफिस पुढे रांगा लावत. आदल्या रात्री पासून रांग लावणार्‍या प्रेक्षकांचीही संख्या कमी नव्हती. हे उत्साही प्रेक्षक स्लिपिंग-बॅग घेऊन मुक्कामालाच येत असावेत. मी पाहिल्या दिवशी सकाळी सकाळी कसा बसा पावणेसात वाजता (म्हणजे माझ्या मते फारच लौकर) बुकिंग ऑफिस वर पोचलो तर तिथे दीडएकशे जण माझ्या आधीच उभे. बर अशा दीड-दीडशेच्या च्या दोन रांगा दोन बुकिंग ऑफिस साठी. अर्थात या प्रत्येक रांगेसाठी सहा सहा खिडक्या होत्या. याशिवाय दोन तात्पुरत्या उभ्या केलेल्या बुकिंग ऑफिस वर चाळीस पन्नासच्या रांगा होत्याच. याला म्हणतात सिनेमा कल्चर. कारण हे काही “हॉलीवूड बॉलीवूड”चे  चित्रपट नव्हते. आदल्या रात्रीच रांगेत आलेले प्रेक्षक पाहून मला आपल्या चतुरंगची सवाई एकांकिका स्पर्धा आठवली.

या चित्रपट महोत्सवात काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या. मुख्य म्हणजे  प्रत्येक खेळ अगदी वेळेवर चालू होतो. चित्रपट सुरू होण्यापूर्वी दोन मिनिटे दरवाजे बंद केले जातात. मग तुमच्याकडे तिकीट असले तरी प्रवेश नाही. त्यामुळे एकदा का चित्रपट सुरू झाला की तुमच्या समोरून कोणी जाण्याची शक्यता नाहीच. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच सर्व प्रेक्षक आसनस्थ झालेले असतात.

एखाद्या चित्रपटाचा दिग्दर्शक किंवा त्यातील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित असेल तर त्यांची केवळ ओळख करून दिली जाते. त्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते. पण तथाकथित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देणे वगैरे भानगडी नाहीत. त्यामुळे तथाकथित मान्यवरांची वाट पाहणे नाही.

या महोत्सवास चेक रिपब्लिकच्या Ministry of Culture चे सहाय्य असूनही कुठेही सरकारी हस्तक्षेप किंवा सरकारी अधिकाऱ्यांची निर्लज्ज ढवळाढवळ दिसली नाही. महोत्सवाच्या सभासदांसाठी एका चित्रपटगृहातून दुसर्‍या चित्रपटगृहात ये-जा करण्यासाठी  तीन बस मार्ग विनामूल्य उपलब्ध होते. तसेच काही सायकल रिक्षा सुद्धा होत्या.

कोणत्याही चित्रपटापूर्वी कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत वाजवले जात नाही. “आंतरराष्ट्रीय” महोत्सवात चित्रपट बेल्जियमचा असो किंवा फ्रांसचा अथवा कोरियाचा, आपलंच राष्ट्रगीत वाजवण्याचा भंकपपणा फक्त भारतातच केला जातो बहुतेक.

या चित्रपट महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवाच्या निमित्ताने प्रदर्शित केलेल्या दोन-तीन मिनिटांच्या प्रोमो फिल्म्स. यात “क्रिस्टल ग्लोब पुरस्काराची” यथेच्छ थट्टा केली होती आणि तीही गतवर्षीच्या पुरस्कार विजेत्यांना यात भूमिका करावयास देऊन. हे करण्यासाठी मुळात मोठे मन लागते आणि आपलीच टोपी उडवून घेण्याचे धाडस लागते. या छोट्या फिल्म्स यु-ट्यूबवर (https://www.youtube.com/user/kviff)  जरूर पहाण्या सारख्या. विशेषत: Casey Affleck, Jude Law, Mel Gibson, Helen Mirren, Jiří Menzel, Miloš Forman, Otakar Vávra, इ. गेल्या काही वर्षातील  “क्रिस्टल ग्लोब पुरस्कार” विजेत्यांच्या फिल्म्स आवर्जून पहा.

कार्लोव्ही व्हॅरी वरून प्रागला आले की लगेच दोन शहरातील फरक कळतो. कार्लोव्ही व्हॅरी अजूनही बोहेमियन साम्राज्याच्या सौंदर्य खुणा मिरवणारे नेटके शहर तर प्राग कम्युनिस्ट राजवटीचा ठोकळेबाज अवतार. दुसर्‍या महायुद्धानंतर आलेल्या कम्युनिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्या अय्याशी पूर्ण करण्यासाठी कार्लोव्ही व्हॅरी शहरात बदल केले नसावेत. 

आता महोत्सव संपवून आम्ही प्रागला जाण्यास निघालो. प्राग (एअरपोर्ट किंवा मुख्य चौक) आणि कार्लोव्ही व्हॅरी (बस स्थानक) दरम्यान दर अर्धा तासांनी बस आहेत. प्रवास साधारण सव्वा दोन ते अडीच तासाचा. “Student Agency” सारख्या खाजगी कंपन्या या बस सेवा पुरवतात. प्रागच्या मुख्य चौकात उतरून आम्ही मेट्रो ट्रेन पकडून आमच्या “लेगी” हॉटेल जवळच्या स्टेशनावर उतरलो. तेथून हॉटेल १ मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर आहे हे GPS ने सांगीतले होतेच. GPS नुसार चालत अर्ध्या पाऊण मिनिटात एका चौकात सिग्नलपाशी आलो. आता GPS फक्त रस्ता क्रॉस करा हॉटेल समोरच आहे असे सांगत होते. 

फोटो इंटरनेट वरून साभार
सिग्नलपाशी सिग्नल पडण्याची वाट पहात, मी उभा असलेला कोपरा सोडून तिन्ही कोपरे डोळे फोडून पाहीले मला हॉटेलच काय पण हॉटेलच्या खाणाखुणाही दिसत नव्हत्या. म्हणजे कितीही मध्यवर्ती ठिकाणी असले तरी हॉटेलचा एक माहोल असतो. 4 स्टारचा तर असतोच असतो. पण इथे कुठे ना साईन बोर्ड ना हॉटेल बाहेर लावले असतात तसे झेंडे. पण सिग्नल पडण्या पूर्वी मा‍झ्या सोबत असलेले माझे जेष्ठ परममित्र विक्रम (भागवत) म्हणाले “अरे, ते बघ, समोरच आहे”. मला काहीच दिसेना. बरं, विक्रम परममित्र असल्याने माझा त्यांच्यावर पहिल्या फटक्यात विश्वास बसणे केवळ अशक्य.  पण त्यांच्या चेहर्‍यावर एक मिनिटात हॉटेल मिळाले हा आणि आता जयंतवर आणि त्याच्या GPS स्किल्स वर अवलंबून राहायला नको असा दुहेरी आनंद दिसत होता. म्हणून मीच सरळ त्यांच्या सोबत रस्ता क्रॉस करून गेलो तर थेट हॉटेलच्या दारात. कपाळावर हात मारला. कारण सीन असा होता...

आम्ही एका मोठ्या कमर्शिअल बिल्डींगपाशी होतो. ज्याच्या डाव्या बाजूला सर्व मजल्यावर काही ऑफिसेस होती. तळ मजल्यावर काही दुकाने होती. आणि त्यातल्याच सर्वात उजवीकडेच्या काचेच्या दारावर “Hotel Legei” असे साधारण १० इंच बाय १८ इंचाचं स्टीकर चिकटवलेले. कम्युनिस्ट ठोकळेबाजपणाचा पहिला ठोकताळा.  

खोलीत गेलो तर खोली चांगलीच प्रशस्त. पण कम्युनिस्ट राजवटीमधील बाबू लोकांनी त्याची पुरती ठासलेली. त्या प्रशस्त खोलीत चार बेड कोंबून तुम्हाला जराही फिरता येणार नाही याची चोख व्यवस्था केलेली. मी विक्रमला म्हटले की "बाबू" लोकांना सरकारी आदेश आला असणार जो “शहरात हॉटेल बांधा” असा नसून “एवढ्या खाटांची सोय करा” असा असणार. 

सर्वात उंच, सर्वात रूंद, सर्वात वेगवान अस अर्थहीन भव्य-दिव्य करण्याच्या हव्यासा पोटी केवळ ठोकळेबाज वास्तु उभ्या होतात. मग राजवट डावी असो वा उजवी.

पण हॉटेलची सर्विस, फूड मात्र अप्रतिम होते. सर्व स्टाफ अतिशय अगत्यशील आणि मदतीस तत्पर. सरकारी कारभार गेल्याचा परिणाम असावा.

प्राग मधील एक चौक
 

असो. बाकी वरील वर्णन फक्त माझे निरीक्षण म्हणून नोंदवले. त्यावरून कोणी टूर मधून प्राग वर काट मारू नये. कारण प्राग एक शहर म्हणून खरोखरच सुंदर शहर आहे.  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अप्रतिम आहे. फक्त तेथील तिकिटांचे प्रकार (झोननुसार / वेळेनुसार) समजून घ्यायला हवे. अर्थात हॉटेल मधील स्टाफ या कामी मदतीस येतो.  

प्रागला पोचे पर्यंत दुपार झाली. आम्ही जेवण करून उरलेल्या अर्ध्या दिवसात शहराचा फेरफटका करण्याचे ठरवले. त्यासाठी ट्राम करून (हो, प्रागमध्ये अजूनही ट्राम्स आहेत) रिपब्लिक स्क्वेअर येथे गेलो.

वलटावा (Vltva) नदीच्या काठी वसलेले प्राग

प्राग हे चेक रिपब्लिक या देशाच राजधानीचे शहर वलटावा (किंवा व्लटावा) (Vltva) नदीच्या काठी वसलेले. पूर्वीच्या बोहेमियन साम्राज्याचा भाग असलेल्या प्राग शहरात अनेक ऐतिहासिक ठिकाण, स्मारके आहेत. हजार वर्षाहून अधिक इतिहास असणारे हे शहर अनेक शतकांच्या युद्ध आणि वादळी राजकीय  घडामोडीनंतर सुद्धा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या खुणा आजही जपत आहे. शहराच्या या जुन्या भागात प्रागचा किल्ला (खरं तर गढी), प्राग कॅसलच्या आवारात असणारे  गॉथिक स्थापत्य शैलीतील सेंट व्हिटस कॅथेड्रल, मध्ययुगीन अॅस्ट्रोनॉमीकल घड्याळ अशा अनेक गोष्टी ३-४ तासात बघता येतात. शहरातील अनेक चौक (Wenceslas Square, Charles Square), त्यातील वेगवेगळ्या स्थापत्य शैलीतील इमारती (National Museum, State Opera इत्यादी)  यातून फिरताना वेळ कसा जातो कळत नाही.

 
सेंट व्हिटस कॅथेड्रल
सेंट व्हिटस कॅथेड्रल
 
 
 
 
 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्राग कॅसल

अभियांत्रिकी शिल्प

 

प्राग कॅसल वगैरे पाहून झाल्यावर आम्ही काफ्का म्युझियम पाहण्याचे ठरवले. हा छोटासा म्युझियम काफ्का विषयी बरीच माहिती देतो. या म्युझियमच्या जवळच एक लघवी करत असलेल्या माणसाचा पुतळा आहे. पण हा पुतळा नेहमीच्या शिल्प कलेतील नसून इंजिनियरिंग स्कल्पचर चा नमुना आहे. हा पुतळा यांत्रिक पद्धतीने साधारण ४० अंशाच्या कोनात फिरत असतो (अर्थात सु-सु करीत). यावर टिपण्णी करताना आमचा गाईड म्हणाला की हा आमच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रतिक आहे. त्याच्या बोलण्यातील उपरोध जाणवला पण पटकन त्याचा रोख कळेना. पुढे त्याचा खुलासा करताना तो म्हणाला की चेक रिपब्लिक EU (युरोपियन यूनियन) मध्ये सामील झाल्या पासून आमच्या राष्ट्राध्यक्षांना याशिवाय आता काही कामच उरले नाही. EU मध्ये सामील होण्याच्या निर्णयावर युरोपीय राष्ट्रात (विशेषत: पूर्व युरोप) संमिश्र प्रतिक्रिया मिळतात. सर्व धोरणे EU ठरवते आणि सभासद राष्ट्रांनी त्याची फक्त अंमल बजावणी करायची असा व्यवहार असल्यामुळे सभासद राष्ट्रामधील लोकांना काहीसे खटकते. पण EU कडून चांगला अर्थ पुरवठा सुद्धा होतो हेही ते मान्य करतात. या अर्थ पुरवठ्यावरच चेक रिपब्लिक, पोलंड, इ. राष्ट्र कात टाकत आहेत. असो. एकेकाळच्या कम्युनिस्ट हुकुमशाही राजवटीतून मुक्त होऊन थेट राष्ट्राध्यक्षांवर अशी टिप्पणी पब्लिकमध्ये करण्या इतका मोकळेपणा चेक रिपब्लिक मध्ये आलेला पाहून समाधान वाटले. (आणि आपला या बाबतीत होत असलेला उलटा प्रवास आठवून हेवा सुद्धा वाटला).

 

 

 

St. John of Nepomuk

 

 

इथूनच चालत चालत आपण ऐतिहासिक चार्ल्स ब्रिज वर जाऊ शकतो. दगडी कमानीनी बनलेल्या ह्या मध्ययुगीन पुलाचे बांधकाम सम्राट चार्ल्स ४था या राजाच्या कारकि‍र्दीत १३५७ ला सुरू झाले आणि जवळपास ५० वर्षांनी पूर्ण झाले. ११५८ साली बांधलेल्या पुलाचे १३४२च्या पुरात नुकसान झाल्याने त्याला पर्याय म्हणून हा पूल बांधण्यात आला. कालांतराने चार्ल्स ब्रिजच्या दोन्ही कठड्यावर अनेक संतांचे पुतळे बसवले. बोहेमियातील त्या काळाच्या प्रसिद्ध शिल्पकारांनी हे पुतळे केले आहेत. त्यातील सेंट जॉन (St. John of Nepomuk ) याचा १६८३ साली बसवलेला पुतळा प्रसिद्ध आहे. पुलाच्या रक्षणासाठी ३ मनोरे (ब्रिज टॉवर) आहेत. या पुलासंदर्भात काही आख्यायिका आणि दंतकथाही प्रचलित आहेत (त्यातील काही गमतीशीर तर काही अंधश्रद्धा वाटतील).

 

 

 

 

चार्ल्स ब्रिज
  
प्राग जवळच आणखी एक ऐतिहासिक शहर म्हणजे चेकी क्रूमलाव्ह (Cesky Krumlov). युनेस्कोच्या जागतिक वारसा (Unesco World Heritage) यादीत समावेश असलेले हे छोटेसे शहर.  

दक्षिण बोहेमियाचा भाग असलेले चेकी क्रूमलाव्ह प्राग पासून साधारण १४० कि.मि. वर वल्टावा नदीच्या तीरावर वसले  आहे. आठशे वर्षापूर्वीच्या क्रूमलाव्ह किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या ऐतिहासिक शहरात फारसे बदल झालेले नाहीत. या शहराच्या गल्ल्या गल्ल्यातून फेरफटका मारत शहरातील गॉथिक, रेनेसाँ, आणि बाराक स्थापत्य शैलीतील इमारतींचे सौंदर्य बघण्यात एक वेगळीच मजा आहे. प्रागवरून क्रूमलाव्हची टूर करण्यात पूर्ण दिवस लागतो. १२४० साली बांधलेला क्रूमलाव्ह कॅसल बघण्यासाठी थोडा वेळ अधिकच देणे चांगले. 

चेकी क्रूमलाव्ह
 

नंतर या शहराच्या गल्ल्यातून भटकताना एक वेगळाच खजिना पाहिला मिळाला. अर्थात हा आमच्या कार्यक्रमात नव्हता. या गल्ल्यांमधून अनेक छोटी दुकाने आहेत. तिथे विंडो शॉपिंग करताना एका दुकानासमोर आलो. त्याच्या शोकेस मध्ये काही जुन्या काळातील गोष्टी ठेवलेल्या. जरा आत डोकावलो तर अशा अनेक गोष्टी. आतमध्ये एका भिंतीपाशी गेल्या शतकातील दुकान थाटलेले. अगदी त्यावेळी जसे असायचे तसे. म्हणजे दुकानातील डबे, बरण्या, तराजू, कॅश रजिस्ट्री मशीन, रॉकेलच्या बाटल्या अस सगळे गेल्या शतकातील. अगदी दुकानदार (म्हणजे त्याचा पुतळा होता पण) गेल्या शतकातील वेषात. ते दुकान नसून एक खाजगी म्युझियम होता. तोही कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय. 

म्युझियम मधील गेल्या शतकातील कॅश रजिस्ट्री मशीन

म्युझियम मधील गेल्या शतकातील दुकान
 


 
आमचा पुढचा कार्यक्रम होता सत्तर हजार माणसांच्या हाडांनी सजवलेले चर्च बघण्याचा. हे चर्च आहे प्राग पासून ७०-७५ कि.मि वर असलेल्या कुतना-होरा या गावी. इ.स ११४२ पासून वसाहतीची सुरवात झालेले हे शहर नंतर १३व्या शतकापासून १८व्या शतका  पर्यंत “चांदीचे शहर” म्हणून  प्रसिध्द झाले ते चांदीच्या खाणींमुळे.  या शहराला सुद्धा १००० वर्षाहून अधिक इतिहास आहे. सेंट बार्बरा चर्च, कॅथेड्रल, बोहेमियाचा राजा वेन्सेसला ४था (King Wenceslas IV) याचे निवासस्थान पाहून आपण सेडलेस ऑसुअरी (Sedlec ossuary) पाहण्यास जाऊ शकतो. 
 
हाडांनी सजवलेले चर्च (सेडलेस ऑसुअरी)

 
हाडांनी सजवलेले चर्च (सेडलेस ऑसुअरी)
 
 
हे प्रार्थनास्थळ चक्क मानवी हाडांनी सजवलेले आहे. एरवी हाडे, कवट्या या गोष्टी भीतीदायक किंवा अगदी बिभित्स वाटतात. पण या चॅपल मध्ये गेल्यावर भीती तर वाटत नाहीच पण हाडे, आणि कवट्यांचा इतका  कलात्मक वापर करून सजावट करता येते हे पाहून आश्चर्य वाटते. हाडे आणि कवट्यापासून बनवलेले हार, झुंबर आणि भिंतीवरची सजावट पाहून थक्क व्हायला होते. मुख्य प्रश्न पडतो ही एवढी हाडे कुणाची आणि इथे कशी आली. हा इतिहासातील एखादा वंश संहाराचा प्रकार होता कि काय? आमच्या गाईडने सांगितले कि पूर्वी कधीतरी आलेल्या महामारीत अनेक माणसे दगावली. त्यांचे सामुदायिक दफन करण्यात आले. त्यानंतर तेथे  असलेल्या चर्चची डागडुजी करण्यासाठी खोदकाम केले तर अनेक मुडदे सापडू लागले. त्याच हाडानी हे  चॅपल सजवले.
 
 
हाडांनी सजवलेले चर्च (सेडलेस ऑसुअरी)
 
 
 
हाडांनी सजवलेले चर्च (सेडलेस ऑसुअरी)

 

सेंट बार्बरा चर्च
 
या बरोबर आमचा झेक रिपब्लिक मधील मुक्काम संपला. दुसया दिवशी सकाळी पावणे आठची युरो रेल ची ट्रेन होती. तिने आम्ही निघालो वार्सा (पोलंड) येथे जाण्यास. 

तेंव्हा पुढच्या लेखात करूया पोलंडची सफर.

लवकरच....

लेखातील हॉटेल लेगीचा फोटो इंटरनेट वरून साभार
बाकी सर्व फोटो - जयंत पोंक्षे

सौर दिनांक पौष २८, शके १९४३

Most Read >>