गोष्ट - गाडल्या गेलेल्या गावांची

 

गोष्ट आहे दोन हजार वर्षांपूर्वीची. अगदी अचूक सांगायचं झालं तर आज पासून एक हजार नऊशे बेचाळीस वर्षांपूर्वीची, म्हणजे सन ७९ची. त्याकाळी मध्यपूर्व आणि बऱ्याचशा युरोपच्या भागावर सामर्थ्यशाली रोमन साम्राज्याची सत्ता होती. याच सामर्थ्यवान रोमन साम्राज्यातील दोन नगरे पॉम्पे किंवा पॉम्पेई (POMPEII) आणि हरक्यूलॅनीयम(HERCULANEUM) यांची ही कहाणी.

ही दोन्ही शहरे अत्यंत संपन्न आणि सधन. त्यातही पॉम्पेपेक्षा हरक्यूलॅनीयम जास्ती सधन. नगर रचना अत्यंत आखीव रेखीव. उभे आडवे समांतर रस्ते. रस्त्याच्या दोन्हीबाजूस पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ (फुटपाथ). रस्ता ओलांडायचा असेल तर रस्ता ओलांडण्यासाठी ठराविक अंतरानी रस्त्यावर असलेले उंच दगड (स्टेपिंग स्टोन्स). या दगडांमुळे पादचार्‍याना रस्ता ओलांडताना रस्त्यावरून वाहणार्‍या पावसाच्या पाण्याचा त्रास होत नसे आणि हे दगड वाहतुकीसाठी गतिरोधकाचे (SPEED BREAKER) काम करत.


मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दुकाने, गरम गरम रुचकर पदार्थांची उपहारगृहे, आणि मदिरालये. रस्त्यात जागोजागी पाणपोया. नगरात श्रीमंतांच्या मोठमोठ्या हवेल्या, विशाल नाट्यगृह, ग्रंथालय, भव्य मंदिरे, आणि खेळांसाठी मैदाने. समाजजीवन नियमबद्ध तरीही संस्कृतीत बराच मोकळेपणा असावा. दुर्दैवाने गुलामगिरीची पद्धतही होतीच.

मुख्य रस्ता सरळ पुढे मुख्य नगर चौकात मिळतो. हा नगर चौक अत्यंत भव्य. भव्य म्हणजे किती तर चार-पाच  हजार माणसे सहज सामावून घेईल एवढा. या चौकाच्या एका टोकाला ज्युपिटरचे मंदिर.


दुतर्फा विशाल कमानी असलेल्या इमारती आणि त्या इमारतीत वेगवेगळी दुकाने. चौकात ज्युपिटर मंदिराच्या मागेच तो पर्वत दिसायचा. व्हेसुव्हियस पर्वत (MOUNT VESUVIUS). त्या चौकातून पर्वताचे अत्यंत नयनरम्य दृश्य दिसे. अनेक शतके नगरवासी त्या चौकातून त्या सुंदर पर्वताचे दर्शन घेत चौकात आपला वेळ घालवत. त्या दिवशीही संध्याकाळी नगरवासी मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना अनेकांनी त्या पर्वताकडे नजर टाकलीच. पण या नगरचौकाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या पर्वताच्या मनात आज काहीतरी खदखदत असावे. काही नगरजनांना शंका आलीही होती. बहुदा!! काहींना त्याची जाणीवही झाली असावी. काहीतरी विपरीत घडणार असं अनेकांना वाटत असावं आणि म्हणूनच नगरातल्या बऱ्याच जणांनी तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण आपला मुक्काम दुसरीकडे हलवला होता. तरीही नगरात बऱ्यापैकी वस्ती होती अजूनही.

संध्याकाळ सरत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने काळोखही लवकर दाटून आला होता. पर्वतराजाच्या मनात काय होते कोण जाणे. नगरवासी दिवसभराची कामं आटपून बाजारहाट करीत होते तर काही जण मदिरालायात मदिरेचा आस्वाद घेत तर काही उपाहारगृहात रुचकर पदार्थांवर ताव मारण्यात गर्क. काही रसिकजन तर चक्क त्यावस्तीकडे वळले. आणि...

व्हेसुव्हियसने फूत्कार केला. धरणी हादरू लागली. पर्वत आग ओकू लागला. ज्वालामुखीचा स्फोट झाला. या स्फोटातून निघालेले विषारी वायू नगरभर पसरू लागले. एकच कोलाहल माजला. माणसे पळण्याचा प्रयत्न करू लागली. पण सर्व प्रयत्न व्यर्थ होते. त्या विषारी वायुंनी आपले काम केले होते. त्यातच ज्वालामुखीच्या उष्म्याने कहर केला. काही वेळातच सर्वजण गुदमरून मृत्यूमुखी पडले. या पाठोपाठ दोन्ही नगरांवर राखेचे लोट आले. आणि काही वेळातच दोन्ही नगरे लाखो टन राखेखाली गाडली गेली. काळाच्या उदरात गडप झाली. पूर्णपणे विस्मरणात गेली.

पण खरंच ती गडप झाली? की नियतीनेच त्या राखेखाली दोन हजार वर्षांपूर्वीचा काळ गोठवून ठेवला, पुढील पिढ्यांसाठी?

पॉम्पे/ हरक्यूलॅनीयम : काल

काही काळासाठी रोमन साम्राज्यातील ही नगरं विस्मृतीत गेली होती खरी. पण जवळपास १६०० वर्षांनंतर म्हणजे १५९९ साली एका इटालीयन अभियंत्याला याचा शोध लागला होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर १७४८ साली स्पेनचा राजा विल्यम चार्ल्स सातवा (
VII) याने या शहरांच्या उत्खननात रस घेतला. मात्र खरी गती आली ती १८६० पासून, अधिकृत उत्खनन करण्यास सुरवात झाली तेंव्हापासून. आजही हे उत्खनन सुरु आहे. आता उत्खनन केलेला बराच भाग आपणास पाहता येतो. चला तर मग घेऊया एक झलक या दोन्ही शहरांची.

पॉम्पे/ हरक्यूलॅनीयम : आज

इटलीमधील नेपल्स पासून साधारण २५ कि. मी. वर आजच्या कॅम्पानिया परगण्यात सेरेनो नदीजवळ पॉम्पे वसले आहे. सुमारे दोन हजार वर्षांपुर्वीच्या समाजजीवनाची पूर्ण झलक इथे पाहिला मिळते. ज्या ज्वालामुखीच्या राखेने विध्वंस केला त्याच राखेने सर्व काही राखलेअसे म्हणावे लागेल. म्हणजे या volcanic राखेखाली सर्व काही होते तसे राहिले. घरे, मंदिरे, भित्तीचित्रे, भांडीकुंडी असे सगळे काही या उत्खननात मिळते आहे. अर्थात इमारतीची पडझड झाली आहे. पण अनेक भिंती त्यावरील रंगीत भित्तीचित्रांसह शाबूत राहिल्या आहेत.

मिळालेल्या मृत देहांच्या सांगाड्यावरून किंवा volcanic material मध्ये असलेल्या मानवी देहाच्या पोकळी वरून अनेक नित्कर्ष काढता येतात. मुख्य म्हणजे त्यांच्या मृत्यूचे कारण. पॉम्पे मधील बरेच मृत्यू हे विषारी वायुमुळे आणि अत्यंत त्रासदायक झाले तर हरक्यूलॅनीयम मधील मृत्यू हे उच्च तापमानामुळे पटकन झाले. तसेच काही मृत्यू हे छत कोसळून किंवा अंगावर ज्वालामुखीच्या उद्रेकातून (Pyroclastic flow) आलेल्या ढिगार्‍या  (derbis) खाली झाले. तज्ञांच्या अंदाजानुसार सुमारे दोन हजार लोक मृत्यूमुखी पडले असावेत. त्यातील साधारण १५०० मृतदेहांचे सांगाडे आत्तापर्यंत सापडले आहेत.


वर वर्णन केल्याप्रमाणे पॉम्पे हे खरच अत्यंत आखीव रेखीव नगर रचना असलेले शहर होते. उभे आडवे समांतर रस्ते. रस्त्याच्या दोन्हीबाजूस पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ (फुटपाथ). रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यामधे असलेले उंच दगड (स्टेपिंग स्टोन्स).


या शहरात काय नव्हते
? आधुनिक शहरात असलेल्या सर्व सुविधा जसे की दुकाने, बेकरी, पिठाच्या गिरण्या, तेलाच्या घाणी, मंडया, नाट्यगृह, क्रीडांगणे, मंदिरे, मदिरालये अगदी सर्व काही. हो! वेश्यागृहे सुद्धा. बर त्यात देखील मोकळा-ढाकळा व्यवहार. त्या वस्तीकडे जाणारा रस्ता दाखवणाऱ्या मार्गदर्शक खुणा मुख्य रस्त्यावर ठळकपणे आजही दिसतात. हो, उगाच कोणा नवख्याला आपली तर्जनी नासिके जवळ नेऊन दबक्या आवाजात याची काही सोय आहे का हो?” असे विचारात बसायला नको.



असो. नगरात असलेल्या घरांवरून संपन्नतेची कल्पना येते. अर्थात ही सर्व घरे अमीर उमरावांची. पण त्यावरून त्यांच्या विलासी जीवनाची कल्पना येते. घराला मोठे प्रांगण. मधल्या चौकातील छताला वर एक मोठे भोक ज्यातून पावसाचे पाणी त्याखाली बांधलेल्या एका हौद सदृश्य आकाराच्या चौकोनात पडत असे. (त्या काळात सुद्धा रोमन लोकांनी Rain Harvesting चा विचार केला होता.) घरात मोठा दिवाणखाना, अनेक दालने, जेवणाची भव्य खोली (Dining room). बहुतेक वेळा या खोलीसमोर सुंदर बाग असे. आणि नसलीच तर त्याची कमतरता या Dining Room मधील एका भिंतीवर अप्रतिम भित्तीचित्र काढून केली जाई. येथील भित्तीचित्र आणि त्याचे रंगकाम पाहून खरच आपण थक्क होतो (जसे अजंठा मधील चित्रकाम पाहून होतो).


बर, या रंगकामात काळ्या रंगाचा वापर जास्त असेल तर घरमालक श्रीमंत समजायचा. काळा रंग हा खूपच महागडा होता कारण तो हस्तिदंतापासून बनवावा लागे. रोमन लोकांचे खाण्या पिण्यावर विशेष प्रेम होते. त्यामुळेच त्यांच्या Dining room भव्य आणि झकास अशाच होत्या. या तुलनेत शयन-गृह (Bed room) अगदीच छोटे आणि साधे. साहजिकच आहे, एकदा का एखाद-दोन ग्लास वाईन घेऊन झोपले कि खोली छोटी असली काय किंवा मोठी, काय फरक पडतो? हाच वास्तववादी विचार असावा. या घरांमधील मोझियाक टाईल्सचे कामही अप्रतिम आहे.

अशाच घरांपैकी एक नोनीयस बालबस (Nonius Balbus) या उमरावाचे घर हरक्यूलॅनीयम मधे पाहिला मिळते. तब्बल १८०० चौरस मीटर आकारमानाचे हे घर हरक्यूलॅनीयम मधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे घर आहे. हे घर इ. स पूर्व २७ ते इ. स १४ या कालखंडात बांधले असावे असा अंदाज आहे. प्रांगणाच्या सभोवती खांबांची रांग (Colonnade) असून दोन खांबांच्या मधे संगमरवरी चकत्यांवर काही मुखवटे टांगले आहेत. दुष्ट शक्ती पासून घराचे रक्षण व्हावे म्हणून त्याकाळी असे मुखवटे टांगण्याची प्रथा ग्रीक रोमन लोकांमध्ये होती. यातील मागील भिंतीवर लाल पिवळा रंग आहे. याचा मूळ रंग पिवळाच होता पण रासायनिक प्रक्रियेमुळे तो लाल झाला असा नित्कर्ष तज्ञांनी काढला आहे.

या सर्व घरांतून उत्खननात फर्निचर सुद्धा मिळाले आहे. काही ठिकाणी (विशेषत: हरक्यूलॅनीयम मध्ये) दरवाजे/ खिडक्या carbonized झाल्यामुळे शाबूत राहिल्या आहेत. त्यात एक सरकता दरवाजा (sliding door) सुद्धा आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या घरांना चक्क पाईपमधून पाणी पुरवठा होत होता. यांचा पुरावा म्हणजे जमिनीत आणि भिंतीत असलेले पाणी पुरवठा करणारे पाईप. हे पाईप शिशाचे आहेत. इतकेच काय तर सांडपाणी वाहून नेण्याची (मलनिस:रणाची) व्यवस्थाही होती. या मलनिस:रणाचे पाईप बनवण्याचे साचे एका दुकानात पाहिला मिळतात. या उत्खननात पाणी प्रवाहाचे नियोजन करणारा ३-way व्हॉल्व्ह सुद्धा मिळाला आहे.


नगरात अनेक स्नानगृहे आहेत. याची रचना पाहून थक्क झालो मी. आजचे स्पा झक मारतात याच्या समोर. या स्नानगृहात प्रतीक्षागृह (Waiting room), कपडे बदलण्यासाठी खोली (Changing room) अगदी locker सकट. या दोन्ही ठिकाणी भिंतीवर आणि छतावर अप्रतिम सजावट. वेगवेगळ्या प्रकारची स्नानगृहे. म्हणजे थंड पाण्याचे,
कोमट पाण्याचे आणि गरम पाण्याचे (स्टीम बाथ). स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळी स्नानगृहे. दोन्हीची रचना सारखीच. फरक एकच. तो म्हणजे स्त्रियांच्या स्नानगृहात थंड पाण्याच्या स्नानाची सोय नसे. याच कारण रोमन लोकांची अशी समजूत होती कि स्त्रियांनी थंड पाण्याने स्नान केले तर त्यांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होईल.

नगरामधील असलेल्या दुकानात तेलाच्या घाणी (अर्थात olive oil), वाईन शॉप्स, तसेच गरम गरम रूचकर अन्न देणारी उपहारगृहे (याला thermopolium असे म्हटले जायचे), बेकरी अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. या उत्खननात एका बेकरीमध्ये एक पाव सुद्धा सापडला (अगदी त्यावर असलेल्या ठशा सकट).


 

नगरातील अॅम्फीथिएटर भव्य तर आहेच पण आजही बऱ्याच चांगल्या अवस्थेत आहे. नगरात मंदिरे देखील बरीच आहेत. कारण रोमन संस्कृतीत हिंदू संस्कृती प्रमाणे अनेक देवतांची पूजा होत असे. या सर्व मंदिरात मुख्य नगर चौकात असलेले ज्युपिटरचे मंदिराचे अवशेष त्याच्या भव्यतेची कल्पना देतात. अर्थात नगर चौकसुद्धा इतका विशाल आहे कि त्या चौकात तसेच भव्य मंदिर हवे. या शिवाय अपोलो, नेपच्यून, व्हीनस, एस्केलेपियस आणि इतर देवतांची मंदिरे सुद्धा आहेत.




विशेष म्हणजे या बहुतेक इमारतींच्या अवशेषां वर ती नक्की कसली असेल हे कळून येईल अशा खुणा किंवा मजकूर आहे. म्हणजे थिएटरच्या प्रवेशद्वारा वर
अॅम्फीथिएटरअसे कोरलेला दगडी फलक, घराचा फलक, वाईन शॉप्सच्या भिंतीवर वाईनचे प्रकार आणि त्याची किंमत असे बरेच काही.

वेश्या वस्तीतील घरांच्या (किंवा कोठ्यांच्या) भिंतीवर कामसूत्रा प्रमाणे वेगवेगळी संभोगावस्थेतील चित्रे आहेत. तसेच वेश्या वस्तीतील एका घरावरील प्रवेशद्वारावर पुरुषाच्या लिंगाची आकृती कोरली आहे. समृद्धी आणि भरभराटीसाठी तसे करण्याची त्यावेळची रूढी. (ते पाहून मला ग.दि माडगूळकरांच्या “पूजास्थान” कवितेची आठवण झाली. विशेषत: “दे अन्न तयाची मानव करितो पूजा....” या ओळींची.

 

एकूणच हि सफर दोन हजार वर्षांपूर्वीचा काळ जसाच्या तसा उभा करते.

पॉम्पे/ हरक्यूलॅनीयम : उद्या

या शहरांचे १८६० साली सुरु झालेले उत्खननाचे काम आजही दीडशे वर्षांनंतर चालू आहे. युरोप, अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातील अनेक विषयातील तज्ञ मंडळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन हजार वर्षांपुर्वीच्या संस्कृतीचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून अधिक अधिक माहिती मिळवत आहेत. त्या काळच्या लोकांचा शेती व्यवहार, आहार, वाईनचे प्रकार, ती करण्याची रीत यावर बरीच माहिती मिळवण्यात यश आले असून तशा पद्धतीची वाईन बनवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

या ठिकाणी अनेक carbonized झालेले गठ्ठे मिळाले आणि ते कसले असावेत यावर अनेक वर्षे प्रश्नचिन्ह होते. पण आता लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून हे कोडे आता उलगडले आहे. हे गठ्ठे म्हणजे carbonized झालेली पुस्तके आहेत. लेझर तंत्रज्ञाने त्याचा एक एक थर अभ्यासण्यात येत असून काही थरातून अक्षरे मिळवण्यात यश आले आहे. कोणी सांगावे, त्याकाळचे एखादे अभिजात काव्य अथवा नाट्य हाती लागेल आणि आणखी एखादे Oedipus Rex पुढच्या पिढीला उपलब्ध होईल.

असो. वाचकांना साहजिकच प्रश्न पडेल की या लेखात वर्णन केलेल्या सर्वच गोष्टी पॉम्पे येथे पाहीला मिळतात का? तर नाही. म्हणजे वर्णन केलेल्या इमारती, दुकाने, स्नानगृह, त्यातील भित्तीचित्रे, मंदिरे, काही भांडीकुंडी, तुरळक फर्निचर, तसेच ज्या अवस्थेत आणि जिथे सापडले तिथेच आणि तसेच प्लास्टर मधे कास्ट केलेले मानवी देहांचे पुतळे, असे बरेच काही इथे पाहता येते. पण इतर गोष्टी म्हणजे पाण्याचा व्हॉल्व्ह, फर्निचर अशा जंगम (movable) गोष्टी मात्र प्रत्यक्ष साईटवर नाहीत. या सर्व गोष्टी नेपल्स येथील आणि इतर काही म्युझियम्स मधे ठेवल्या आहेत. याचे प्रदर्शन जगभरातील अनेक म्युझियम्स करीत असतात. जवळपास पंधरा वर्षापूर्वी अमेरिकेतील बोस्टन मधील विज्ञान केंद्रात भरलेल्या पोम्पे विषयक एका प्रदर्शनात मला या पॉम्पेतील गोष्टी पाहील्या मिळाल्या. त्याच वेळी विज्ञान केंद्रातील थिएटर मधे पोम्पेवरची सुंदर डॉक्युमेंटरी पाहीली  आणि त्यावरूनच मी पॉम्पे येथे कधीतरी जायचेच हे निश्चित केले होते.

प्रश्न हा पडतो की हा ठेवा अजून किती दिवस टिकेल? येणाऱ्या पिढ्यांना हे पाहिला मिळेल का? पॉम्पेला धोका आहे तो व्हेसुव्हियसचाच. कारण तो एक जिवंत ज्वालामुखी आहे. सन ७९ मधील उद्रेका नंतर तसा त्याचा काहीवेळा उद्रेक झाला पण नशिबाने ते उद्रेक विनाशकारी नव्हते. काही तज्ञांच्या मते व्हेसुव्हियसचा कधीही उद्रेक होणे आता अपेक्षित आहे. आज या प्राचीन स्थळा इतकाच  आजच्या पॉम्पेला (म्हणजे तेथील लोकवस्तीला) धोका आहेच. आजच्या अत्याधुनिक तंत्रामुळे व्हेसुव्हियसचा उद्रेक होण्यापूर्वी सात दिवस आधी कळू शकेल. त्याने जीवितहानी नक्की टाळता येईल. पण या प्राचीन स्थळाची हानी कशी रोखणार? आजतरी काही उपाय नाही.

आपण फक्त आशा करुया की व्हेसुव्हियसची पुन्हा अवकृपा होणार नाही आणि हा संपन्न वारसा आपण पुढील पिढ्यांना सुद्धा दाखवू शकू. पण दुर्दैवाने असे झाले नाही तर? याच साठी हा सर्व वारसा डिजिटल स्वरूपात करण्यात येत आहे. जवळपास ६०-७० हेक्टर इतक्या आकाराचे उत्खनन पॉम्पे येथे झाले आहे (जे साधारण एकूण अंदाजित प्राचीन पॉम्पेच्या २/३ आहे). या सर्व परिसराचा इंचन इंच स्कॅन करून झाला आहे. आणि त्यावरून प्रत्यक्ष पॉम्पे कसे असेल याचे त्रिमिती चित्र (थ्रीडी मॉडेल) बनवले जात आहे. लवकरच आपण याची व्हर्च्युअल टूर करू शकू. पण मी तुम्हाला आग्रहाने सांगेन की अशी वेळ येण्यापुर्वीच तुम्ही पॉम्पे आणि हरक्यूलॅनीयमला भेट द्याच.

पॉम्पेमधून बाहेर पडताना एकच विचार मनात होता. कोणताही वृथा अभिमान न बाळगता, एखादी वास्तू इतिहासात आपल्या राज्यकर्त्यांनी बांधली की आक्रमकांनी बांधली हे न पाहता; सर्व प्राचीन गोष्टी या मानवी संस्कृतीचा पुढील पिढ्यांसाठी असलेला ठेवा आहे हे मान्य करून ते जपण्यासाठी अविरत कष्ट घेणारा समाज कोठे? आणि वांझोट्या धर्माभिमानातून प्राचीन बुद्ध मूर्तींवर तोफा डागणारा किंवा बाबरी मशिदीचा विध्वंस करणारा तालिबानी मनोवृत्तीचा समाज कोठे?

अशा कृत्यांनी ना आपला इतिहास बदलत, ना वर्तमान ना भविष्य. पण एका संस्कृतीचा इतिहास (मग भले ती आक्रमकांची असेल) पुढील पिढ्यांसाठी कसा जपायचा, इतिहास अलिप्तपणे, वैज्ञानिक दृष्टीने कसा अभ्यासायचा हेच या सफरीतून शिकायचे.

(लेखातील छायाचित्रे : जयंत पोंक्षे)

पुढची सफर करुया चेक रिपब्लिक मधील कार्लोव्ही व्हॅरी, प्राग, चेकी क्रूमलाव्ह, आणि कुतना-होरा या शहरांची. लवकरच....
 
भारतीय सौर दिनांक १९-आषाढ-१९४३ (१० जुलै २०२१)

Most Read >>